रायगड - राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम ही सध्या आरोग्य, महसूल, पोलीस आणि फ्रंट वर्कर यांच्यासाठी सुरू करण्यात आली. यानंतर तिसऱ्या टप्प्यात सोमवारी 1 मार्चपासून 50 व 60 वर्षांवरील सामान्य जनतेसाठीही कोरोना लसीकरण मोहीम शासनाकडून सुरू केली जाणार आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात हे लसीकरण केले जाणार आहे. मात्र, असे असले तरी याबाबतची कोणतीही पूर्वतयारी जिल्ह्यात झालेली नसल्याने सामान्य नागरिकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
अद्यापही सूचना नाहीत -
राज्यासह रायगड जिल्ह्यातही सामान्य नागरिकांना लसीकरण मोहीम 1 मार्चपासून सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाकडे याबाबत अद्यापही कोणत्याही सूचना, आदेश वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन ही संभ्रमात आहे.
लसीकरणाबाबत शिबिरे नाही -
सामान्य नागरिकांना लसीकरण सुरू केले जाणार आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत दिली जाणार आहे. तर खासगी रुग्णालयात लसीकरणाचे पैसे घेतले जाणार आहेत. मात्र, लसीकरण कसे करायचे? याबाबत ट्रेनिंग घेणे गरजेचे आहे. खासगी डॉक्टर आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत ट्रेनिंग देणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्र उभारण्यासाठी जागा, आवश्यक कर्मचारी आहेत का? हे तपासणे महत्त्वाचे आहे. तसेच नागरिकांची कोविन अॅपमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयात होणाऱ्या लसीकरणाची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे प्राप्त होणे गरजेचे आहे. खाजगी रुग्णालय कितपत सहकार्य करणार? याची माहिती घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा - मी मास्क घालतच नाही; राज ठाकरेंचे माध्यम प्रतिनिधींना उत्तर
सामान्य नागरिकांना कोणती लस देणार -
कोरोनाच्या दोन लसी कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन देशात उपलब्ध आहेत. कोव्हॅक्सीन लसीसाठी नागरिकांची परवानगी पत्र घेणे गरजेचे आहे. तसेच 50 व 60 वर्षावरील नागरिकांची आरोग्याबाबत माहिती भरून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार होणेही गरजेचे आहे.
सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध नाही -
सोमवारी 1 मार्चपासून सामान्य नागरिकांना लसीकरण सुरू करणार असल्याचे बोलले जात असले तरी जिल्ह्यात अद्यापही लसीकरणाचा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणा बाबतची पूर्ण तयारी झाल्यानंतरच नागरिकांना लसीकरण सुरू केले जाईल.