रायगड - निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील नागरिक, शेतकरी उद्ध्वस्त झाला असून शासनाने यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या या संकटामध्ये जिल्हा प्रशासनाने आधीच खबरदारीची पावले उचलली. त्यामुळे त्यांनी प्रशासनाचेही कौतुक दरेकर यांनी केले आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जिल्ह्यात दौरा केला. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले आहे. शिवसेनेचे वैभव कोकणच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला विशेष पॅकेज जाहीर करावे. त्यांनी तसे केले नाहीतर आम्ही विरोधी पक्ष म्हणून शांत बसणार नाही, असेही दरेकर म्हणाले.
चक्रीवादळामुळे नुकसान कमी झाले आहे. मात्र, वित्तहानी झाली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू देखील झाला आहे. प्रशासन झालेल्या नुकसानीची माहिती घेत आहे. मात्र, अद्यापही त्यांच्याकडे पूर्ण माहिती नाही. तरी लवकरात लवकर माहिती घेऊन नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे दरेकर यांनी सांगितले. तसेच या वादळाच्या परिस्थितीमध्ये प्रशासनाने चांगले काम केले आहे. विरोधी पक्ष म्हणून फक्त विरोधच करणार नाही. प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक करायला पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.