रायगड - गेट वे येथून अजंठा ही प्रवासी बोट 88 प्रवाशांना घेऊन मांडवा बंदराकडे येत असताना बोटीत पाणी घुसून बोट बुडाली. मांडवा पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे या बोटीतील 88 प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत आणि सदगुरू कृपा बोटीतील 2 खलाशांनी बुडणाऱ्या प्रवाशांना वाचविले. त्यामुळे या बोटीतील प्रवाशांचे प्राण वाचविणारे हे 3 जण त्यांच्यासाठी देवदूत ठरले आहेत. पोलीस नाईक प्रशांत घरत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजेश भोस्तेकर यांनी...
हेही वाचा - गतीमंद मुलीवर अत्याचार: प्रकरण दाबण्याचा प्रयत्न.. भाजपने काढला मोर्चा
गेटवे येथून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अजंठा बोट 88 प्रवाशांना घेऊन मांडवा बंदराकडे निघाली होती. मांडवा बंदराजवळ बोट आली असता, अचानक बोटीत बिघाड होऊन पाणी घुसू लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडू लागले. मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना ही माहिती मिळताच त्यांनी सदगुरू कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यांना तातडीने पाठवून दिले.
हेही वाचा - गेट वे कडून मांडवाकडे येणारी प्रवासी बोट बुडाली; ८८ प्रवाशांचे वाचले प्राण
बोटीच्या खलाशांनी तातडीने जाऊन बुडणाऱ्या 88 जणांचे प्राण वाचवून त्यांना सुखरूप मांडवा बंदरात सोडले. बोट पोहोचण्यास थोडा जरी उशीर झाला असता, तर 88 जणांना जलसमाधी मिळाली असती. मात्र, बोटीचे खलाशी आणि पोलीस नाईक देवदूतासारखे पोहोचल्याने प्रवाशांचे प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली.