कर्जत (रायगड) Praful Patel on Sharad Pawar : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाही. पंतप्रधानपदाची संधी त्यांच्याकडं चालून आली होती. मात्र, हातात असतानाही त्यांनी ती संधी घेतली नाही, असा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी सांगितलंय. कर्जत खालापूर इथं राष्ट्रवादी कॉंग्रेच्या अजित पवार गटाचं दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलंय. या शिबिरात पटेल यांनी हा गौप्यस्फोट केलाय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
काय म्हणाले पटेल : शरद पवार देशाचे पंतप्रधान आणि अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा होती. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना हटविण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. परंतु, त्यावेळी सीताराम केसरी यांना काँग्रेसचं अध्यक्ष करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढं एच डी देवेगौडा पंतप्रधान झाले. परंतु, केसरींनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर 135 पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांना येऊन भेटले. तुम्ही केसरींना हटवा अशी विनंतीही त्यांनी केली होती. पण, मला देवेगौडा यांचा फोन आला. मी त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी देवेगौडा यांनी मी राजीनामा देतो, पण केसरींना हटवा, शरद पवार यांना काहीतरी भूमिका घ्यायला सांगा असा निरोप माझ्याकडे दिला होता, असा गौप्यस्फोट केलाय.
ती खंत माझ्या मनात कायम राहील : या सगळ्या घडामोडी होत असताना मी शरद पवार यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की आपल्याला मोठी संधी चालून आलीय. त्यामुळं आता तुम्ही भूमिका घ्या. पण त्यांनी पंधरा मिनिटांत बैठक आटोपती घेत आपण नंतर बोलू असं सांगितलं. त्यावेळी त्यांना काय झालं मला माहीत नाही. परंतु, पंतप्रधान होण्याची सुवर्णसंधी मात्र घालवली. शरद पवार पंतप्रधान झाले असते. ते पंतप्रधान झाले नाहीत, याची खंत माझ्या मनात कायम राहील असं प्रफुल पटेल यावेळी म्हणाले.
पवार 2004 मध्येच भाजपासोबत जाणार होते : भाजपासोबत जाण्याबाबतही प्रफुल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, शरद पवार पहिल्यांदा भाजपासोबत जाणार होते. 2004 साली प्रमोद महाजन आणि आम्ही एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली होती. दिल्लीत माझ्या घरी ही बैठकही झाली होती. लालकृष्ण अडवाणी आणि अलटबिहारी वाजपेयी यांच्या सूचनेनूसार ही मिटींग झाली होती. पण प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. शरद पवार यांचं वजन वाढेल म्हणून प्रमोद महाजन यांना हे नको होतं. त्यामुळं महाजनांनी ही बातमी बाळासाहेब ठाकरेंना दिली. ठाकरेंकडून पवारांवर आरोप होताच पवार-भाजपा युती होऊ शकली नसल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
तेव्हा काय घडलं हे महत्त्वाचं नाही : प्रफुल पटेल यांनी युतीसंदर्भात केलेल्या गौप्यस्फोटावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे काय बोलतात आणि 2004, 2009 याबद्दल आज बोलणार नाही. तेव्हा काय घडलं त्याला महत्व नाही, आज काय होतंय ते महत्वाचं आहे, असं राऊत म्हणाले.
हेही वाचा :
- पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला?- नितेश राणेंचा शरद पवारांना सवाल
- Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर यंदाही पवार कुटुंब बारामतीत एकत्र येण्याची शक्यता धूसर, 'हे' आहे कारण
- NCP Leader PP Faizal : शरद पवार गटाला मोठा दिलासा; लोकसभा अध्यक्षांच्या 'त्या' निर्णयानं वाढली खासदारांची संख्या