रायगड- अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे बुधवारी झालेल्या राडाप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांकडून 30 ते 36 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा, साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाद्वारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अलिबाग तालुक्यातील बोडणी गावात कोरोनाचे 72 रुग्ण आढळूनही ग्रामस्थ यंत्रणेला सहकार्य करत नाहीत, नियम पाळत नाहीत.ही बाब निदर्शनास आल्यामुळे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी हे ग्रामस्थांना समजावण्यासाठी गेले असता ग्रामस्थ आक्रमक झाले. अधिकारी कर्माचाऱ्याच्या अंगावर धावत येऊन त्यांना अखेर पिटाळून लावले. ग्रामस्थांनी सहकार्याची कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना गावातून काढता पाय घेतला.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल केला गेला.
साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल केला असून सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. मांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मराज सोनके याचा तपास करत आहेत. बोडणी येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कंटेंनमेंट झोनचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत .