रायगड - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला बंदी घातलेली आहे, असे असताना महाड शहरात दोन भाऊ देशी व विदेशी मद्याची विक्री करत होते. याची माहिती मिळताच महाड शहर पोलिसांनी छापा टाकून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
अवैध मद्य विक्री सुरू -
कोरोना काळात मद्याची दुकाने बंद असल्याने तळीरामांची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे चढ्या भावाने मद्य विक्री सुरू आहे. चढ्या भावाने मिळत असले तरी तळीराम मद्य खरेदी करतात. याचा फायदा उचलण्यासाठी काही जण अवैध पद्धतीने मद्य विक्री करीत आहेत. महाड शहरात जुनपोस्ट येथे एका घरात अवैध मद्यविक्री करणाऱ्या दोघा भावांना पोलिसांनी अटक केले आहे.
घरातूनच सुरू होती मद्यविक्री
महाड शहरातील जुनपोस्ट येथे प्रशांत पाटील आणि प्रसन्न पाटील यांचे देशी दारू विक्रीचे अधिकृत दुकान आहे. लॉकडाऊन काळात मद्यापींना होम डिलिव्हरी करण्याची परवानगी दुकानदारांना देण्यात आली आहे. मात्र, पाटील बंधू हे नियमाचे उल्लंघन करून चढ्या भावाने देशी आणि विदेशी मद्याची विक्री करीत असल्याची माहिती महाड शहर पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाटील यांच्या घरावर छापा टाकून कारवाई केली. यामध्ये बियरचा एक बॉक्स, विदेशी दारूचे चार बॉक्स आणि देशी दारुचे 70 बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. या शिवाय दारू विक्री आणि साठा करण्यासाठी वापरण्यात आलेली स्कोडा गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.