रायगड- रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांना पोलिसांकडून आज सकाळी 6:30 वाजता मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा सुरू झाला. रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी आपल्या पथकासह मानवंदना दिली. कोरोना प्रादुर्भाव असल्याने काही मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. पोलिसांकडून मानवंदना देण्यात येणारे पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरानंतर राज्यातील हे दुसरे मंदिर आहे. मानवंदना दिल्यानंतर श्री धावीर महाराज यांची पालखी मंदिरातून आपल्या भावाच्या भेटीला रवाना झाली. पालखी सोहळ्यानिमित्त मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते.
हेही वाचा- वृक्षप्रेमापोटी 'या' अवलियाने घरालाच दिले जंगलाचे रूप
मोजकेच जण मानवंदना सोहळ्यास उपस्थित
पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, नगराध्यक्ष संतोष पोटपोडे, नगरसेवक, मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी हे मोजकेच जण मानवंदना सोहळ्यास उपस्थित होते.
फेसबुक लाईव्ह द्वारे भाविकांसाठी दर्शन आणि आरतीची सुविधा
श्री धावीर महाराज हे रोहा शहरासह तालुक्याचे ग्रामदैवत आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस मोठ्या उत्साहात धावीर महाराजांचा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी धावीर महाराज पालखी सोहळा उत्सवात साजरा केला जातो. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होते. मात्र यावर्षी कोरोना महामारी असल्याने सर्व मंदिरे बंद असल्याने भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली नाही. असे असले तरी मंदिर प्रशासनाकडून फेसबुक लाईव्ह द्वारे भाविकांसाठी दर्शन आणि आरतीची सुविधा करण्यात आली होती.
हेही वाचा- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह
श्री धावीर महाराज यांची भाऊ भेट पालखी सोहळ्याचा मुख्य उद्देश
श्री धावीर महाराज यांची भाऊ भेट हा मुख्य उद्देश पालखी सोहळ्याचा असतो. मात्र कोरोना संकटामुळे धावीर महाराज, धाकसुत यांची भेट होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाने पालखी काढण्यास परवानगी दिली असून भाऊ भेट ही होणार आहे. मात्र यावर्षी नागरिकांच्या घरासमोर पालखी येणार नसल्याने श्री धावीर महाराजांचे दर्शन लांबूनच घ्यावे लागणार आहे.