रायगड - 'पंजाब अॅण्ड महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँके'त (पीएमसी) पैसे अडकल्याने पैशाच्या विवंचनेत असलेल्या खारघरमधील आणखी एका खातेदार महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कुलदीप कौर असे मृत महिला खातेदाराचे नाव आहे. पीएमसी बँकेत पैसा अडकल्याच्या धसक्याने आतापर्यंत सातवा बळी गेला आहे. पीएमसी बँक खातेधारकांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने पीएमसी बँकेच्या खातेधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खारघर सेक्टर १० मध्ये त्या आपल्या पती, सून आणि मुलगी यांच्यासह भाड्याच्या खोलीत राहत होत्या. त्या जीटीबी नगर येथील गुरू तेग बहादूर हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. त्यांचे पती विरेंदरसिंग विग, मुलगा सुखबिरसिंग या तिघांचे खाते या बँकेत आहे. या तिघांचे पीएमसी बँकेमध्ये १५ लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट होते. तसेच कुलदीपसिंग व वरिंदरसिंग या पतीपत्नीच्या खात्यामध्ये दीड लाख रुपयांची तर सुखबीर याच्या खात्यामध्ये ७० हजारांची रक्कम होती. पीएमसी बँकेवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर हे पैसे बँकेत अडकले. पैसे नसल्याने विग कुटुंबीयांनी यावर्षी दिवाळीही साजरी केली नाही. त्यामुळे बँकेत अडकलेली रक्कम मिळेल की नाही, या चिंतेत विग कुटुंबीय होते.
हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : 'नो बेल ओनली जेल', आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार
आपल्या ठेवी व पैसे बुडतील, अशी भीती कुलदीप कौर यांना होती. त्यामुळे कुलदीप कौर दररोज पीएमसी बँकेशी संबंधित बातम्या पाहत होत्या. बुधवारी रात्रीही त्यांनी जेवणानंतर टीव्हीवर पीएमसी बँकेसंदर्भात बातम्या पाहिल्या. झोपी जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या पतीशी बँकेत अडकलेल्या पैशांसंदर्भात चिंता व्यक्त केली. त्यानंतर दोन तासांतच त्यांना त्रास जाणवू लागला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला.
हेही वाचा - नागपूर : शेजारच्या घराची भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
पीएमसी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यामुळे आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस आकड्यात वाढ होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.