रायगड - उमटे धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प बांधलेला असतानाही ऐन गणेशोत्सवात माती मिश्रित अशुद्ध पाणी लाखो नागरिकांना नळाद्वारे येत असल्याबाबतची बातमी ईटिव्ही भारतमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती व उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील यांनी दखल घेऊन महिनाभरात नागरिकांना जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले. तर, नळाद्वारे माती मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे अजून महिनाभर तरी उमटे धरणातून माती मिश्रित पाणी नळाद्वारे येणार असल्याने नागरिकांना महिनाभर कळ सोसावी लागणार आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता राजेंद्र कोळी हेदेखील यावेळी उपस्थित होते. उमटे धरण हे 1984 साली बांधले असून त्यातून 60 गावातील लाखो नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा होत असतो. मात्र, या धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प बांधलेला नसल्याने नागरिकांना टीसाएल पावडरचा मारा करून पाणी दिले जात होते. 4-5 वर्षांपूर्वी या धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र काम दिलेल्या ठेकेदाराने अर्धवट काम केल्याने प्रकल्प अपूर्ण अवस्थेत होता. त्यानंतर प्रकल्पाचे काम दुसऱ्या ठेकेदाराला दिल्यानंतर वर्षभरात काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी 1 कोटी 20 लाख रुपये खर्च झाल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता राजेंद्र कोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा - अदिती तटकरेंचे आश्वासन ठरले फोल, गणपतीपूर्वी शुद्ध पाणी देण्याचं दिलं होतं आश्वासन
जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झाला असून तांत्रिक अधिकारीही यासाठी नेमण्यात आलेला आहे. गणपतीपूर्वी शुद्ध पाणी सुरू करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार 30 ऑगस्ट रोजी शुद्ध पाणी सोडण्यात आले होते. मात्र वॉल खराब झाल्याने पुन्हा माती मिश्रित पाणी नळाद्वारे येऊ लागले. त्यामुळे येत्या महिनाभरात जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरू केला जाईल, असे आश्वासन उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.