रायगड - लिक्विडेशन माध्यमातून ठेवीदारांची फसवणूक केली जात असून हे थांबावे, बँकेने ठेवीदारांच्या पैशातून घेतलेल्या जमिनी विकून पैसे द्या, कथित बोगस कर्जदारावर कारवाई करा, ईडीला या प्रकारणापासून दूर ठेवा, अशी मागणी पेण अर्बन बँक संघर्ष समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी केली आहे. अलिबाग तुषार विश्रामगृह येथे याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे ठेवीदारांचे नुकसान होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
'पेण अर्बन बँक घोटाळा 1200 कोटींचा'
पेण अर्बन बँकेच्या चेअरमन आणि संचालक मंडळाने 2000 हजार साली बोगस कर्जवाटप करून साधारण बाराशे कोटींचा आर्थिक घोटाळा केला. याचा फटका हा लाखो ठेवीदार ग्राहकांना बसला. या घोटाळ्यात आतापर्यंत 50 जणांना अटकही करण्यात आली आहे. बँकेवर प्रशासक बसविले असून त्यांच्याद्वारे कर्जवसुली केली जात आहे. वसुलीतून 60 कोटी जमा झाले असून एक लाखाच्या आतील खातेदारांना 55 कोटीचे वाटप करण्यात आले आहे. बोगस कथित कर्ज 598.72 कोटीचे असून यामधून आतापर्यंत फक्त 5 कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे लिक्विडेशन ही एक फसवणूक असल्याचा आरोप जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
'ठेवीदारांच्या पैशातून करोडोची जमीन खरेदी'
पेण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने पनवेल, कर्जत, सुधागड, पेण परिसरात ठेवीदारांच्या पैशातून शेकडो एकर जमीन खरेदी केली आहे. खरेदी केलेली जमीन विकून ठेवीदारांचे पैसे द्या, असे न्यायालयाने सांगितले आहे. मात्र अद्यापही जमीन विक्री करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने या जमिनी ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे द्यावेत, अशीही मागणीही जाधव यांनी केली आहे.
'प्रशासन जबाबदार'
यास आरबीआय, डीआयसीजी जबाबदार आहे. या घोटाळ्यात ईडीचाही तपास सुरू असून तोही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ईडीला या तपासातून दूर करावे. ठेवीदारांचे हित या प्रकरणात राखले जात नाही. त्यामुळे या सर्व बाबींना प्रशासन जबाबदार असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.