पेण-रायगड - "प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद वाक्य घेऊन मागील अनेक वर्ष प्रवाशांची सेवा करत असलेले एस. टी. महामंडळ कोरोना"च्या विळख्यातून अद्याप सुटलेले नाही. राज्य सरकारने अनेक जिल्ह्यात अनलॉक केले आहे. जिल्हा बंदी उठल्याने प्रवासी वाहतूक देखील सुरू झाली आहे. तरी महामंडळाचे "चाक" अद्याप रुतलेलेच आहे. अनेक मार्गावर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने या मार्गावरील फेऱ्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत, तर दुसरीकडे महामंडळाच्या या उदासिनतेचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सवाले मात्र "सुसाट" सुटले आहेत. एस. टीच्या रातराणी गाड्यांना प्रवासी भेटत नसताना खासगी ट्रॅव्हल्स भरलेल्या दिसत आहेत.
रातराणी सेवा जवळपास बंद -
रायगड जिल्ह्यातील बहुतांशी वाहतूक सेवेचा गाडा हा एस. टी. महामंडळ अनेक वर्षे ओढत आहे. कोरोना काळात एस. टी.च्या या गाड्याला ब्रेक लागला. जिल्ह्यात आज 150 बसेस तर्फे 638 फेऱ्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू आहे. 753 वाहक व 746 चालक यांच्याद्वारे ही वाहतूक केली जात आहे. मात्र, कोरोनाचे संकट पूर्ण संपले नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. वाहतुकीमध्ये उत्पन्नाचे मुख्य स्तोत्र असलेल्या रातराणी गाड्या जवळपास ठप्प आहेत. संपूर्ण जिल्ह्यात मुंबई-दिघी, नालासोपारा-श्रीवर्धन व श्रीवर्धन-बोर्ली-नालासोपारा फक्त तीन "रातराणी" धावत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने अन्य रात राणी सुरू केलेल्या नाहीत. महामंडळाच्या रातराणी सेवा जवळपास बंद असल्याने याचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स वाले घेत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावात घरपोच प्रवासी सेवा देण्यात खासगी ट्रॅव्हल्सवाल्यानी बाजी मारली असून यामुळे अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत आहे.
रायगडची रातराणी ठप्प -
मुंबईपासून जवळच असलेल्या रायगड जिल्ह्यातील अनेक नागरिक मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण आदी परिसरात वास्तव्याला आहेत. या प्रवाशांना कामावरून सुटल्यानंतर रात्री गावी येणे सोयीस्कर पडते. मात्र, जिल्हा अनलॉक होऊन जवळपास पंधरा दिवस होत आले आहेत, तरी महामंडळाच्या रातराणी सेवा ठप्प असल्याने त्यांना खासगी ट्रॅव्हल्स आधार घ्यावा लागत आहे. रायगड परिवहन विभागामार्फत प्रवासी उपलब्धतेच्या अनुषंगाने रातराणीच्या तीन फेऱ्या सुरू आहेत. प्रवाशांच्या उपलब्धता नुसार यामध्ये वाढ करण्यात येणार आहे, असे विभाग नियंत्रक अनघा बारटक्के म्हणाल्या.