रायगड - देशाचे स्वच्छतादूत, पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही वेळातच ही बातमी जिल्ह्यात सर्वत्र पसरली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नियमीत तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्याकडून देण्यात आली आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वय 74 वर्षे आहे. त्यामुळे त्यांची नियमीत तपासणी दरवेळी पुण्यातील एका रुग्णालयात होते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच ती मुंबईतील लिलावती रुग्णालयात होणार आहे. त्यांची प्रकृती खणखणीत असून, काळजी करण्यासारखे काही नाही. शुक्रवारपर्यंत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.