रायगड - राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील दाखल पूर्व 14 हजार 47 व 562 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 14609 प्रकरणे निकाली निघाली आहेत. विशेष म्हणजे या लोकअदालतीमधून 20 कोटी 98 लाख 85 हजार 769 रुपयांची नुकसानभरपाई देखील वसूल करण्यात आली आहे. लोकआदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात रायगड जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वींच्या प्रकरणावर सुनावणी होते, व प्रकरणे निकाली काढण्यात येतात. रायगड जिल्ह्यात शनिवारी 12 डिसेंबरला लोक आदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
14 हजार 609 प्रकरणांचा निकाल
रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा प्र. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये, रायगड जिल्ह्यातील दाखल पूर्व व प्रलंबित अशी एकूण 64 हजार 620 प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखल पूर्व 14 हजार 47 व प्रलंबित प्रकरणांपैकी 562 प्रकरणे अशी एकूण 14 हजार 609 प्रकरणे लोकअदालतीमध्ये निकाली निघाली. या लोकअदलतीमधून 20 कोटी 98 लाख 85 हजार 769 रुपयांची नुकसान भरपाई देखील वसूल करण्यात आली. लोकअदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात रायगडने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी दिली.
सर्वांच्या सहकार्याने लोक अदालतीचे यशस्वी आयोजन
ही लोकअदालत यशस्वी होण्याकरिता रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, सर्व वकील संघटना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील तसेच जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालये व जिल्हा न्यायालय रायगड यांच्या अधिपत्याखालील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सदर लोकन्यायालय यशस्वी केल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे व सचिव संदीप स्वामी यांनी सर्वांचे आभार मानले.