रायगड - अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील ब्रिटिश कालीन जीर्ण झालेला पूल कोसळल्याची घटना रविवारी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. दरम्यान या पुलावरून मोटासायकल तसेच एक चारचाकी वाहन जात होते. या दुर्घटनेत मोटार सायकलस्वार विजय चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. पूल कोसळल्यानंतर मुरुडकडे जाणारी आणि अलिबागकडे येणारी वाहतूक बंद झाली आहे. मुरुडकडे जाण्यासाठी सुपेगाव मार्गे वाहतूक वळविण्यात आलेली आहे.
रविवारी सकाळपासून पावसाचा जोरही जिल्ह्यात असल्याने मुरुड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच काशीद येथील हा ब्रिटिश कालीन जीर्ण झालेला पूल कोसळल्याची घटना घडली. या पुलाच्या दुरुस्तीची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करीत होते. अखेर शासनाच्या नाकर्तेपणामुळे रविवारी हा पूल कोसळला. घटना घडली त्यावेळी या पुलावरून एक दुचाकी आणि कार जात होती. या दोन्ही वाहनांसह हा पूल कोसळला. दुर्दैवाने या घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील अन्यएक स्वार बचावला आहे. विजय चव्हाण असे मृताचे नाव आहे.
2016 मध्ये महाडमध्येही कोसळला होता पूल-
२०१६ मध्ये महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळल्याची घटना घडली होती. रात्रीच्या सुमारास पूल कोसळल्याने सावित्रीच्या महापुरात वाहने बुडाली होती. त्या घटनेमध्ये जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला होता.