रायगड - महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचा ९२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यासाठी हजारोंच्या संख्येने भीम अनुयायीचा भीमसागर चवदार तळ्यावर लोटला होता.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्यातील पाण्याला स्पर्श करुन अखिल मानव जातीला पाण्याचा हक्क खुला केला. या ऐतिहासिक घटनेला आज ९२ वर्ष पूर्ण होत आहेत. चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने सारा परिसर हा निलमय झाला आहे. चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी गर्दी केली होती. चवदार तळे ते क्रांतीस्तंभ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चित्र, पुतळे आणि बिल्ल्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.
चवदार तळे व क्रांतीस्तंभ ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, तर महाड नगरपालिकेमार्फतही येणाऱ्या भीम अनुयायीसाठी स्वच्छता गृह, पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. अनेक सामाजिक संस्थांच्यावतीने येणाऱ्या लोकांना नाश्ता, खाण्यापिण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. गर्दीच्या दृष्टीने पोलिसांनी चवदार तळे, क्रांतीस्तंभाकडे जाणारी वाहतूक बंद केली होती.
केंद्रीय मंत्री व लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घटनास्थळी येऊन बाबासाहेबाच्या पुतळ्याला अभिवादन केले.