रायगड - नागरिकांनी आता स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे असून सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे. जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार नाही, अशी माहीती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पत्रकार परिषद पार पडली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होत्या. यादरम्यान, जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
रत्नागिरीत आजपासून पुढील 8 दिवस कडक लॉकडाऊन
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या वाढत असलेल्या संख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा अनलॉकमध्ये असून पुन्हा लॉकडाऊन करणे हे शक्य नाही. ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे तो परिसर सील करण्यात येईल. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे 60 टक्के असून उर्वरित असलेले बाधित रुग्ण हे लवकरच बरे होणार, अशी माहीती त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णाचे बरे होण्याचे प्रमाण हे चांगले आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी आता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे तो परिसर सील करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.
जिल्ह्यातील काही नगरपालिका क्षेत्रात स्वस्फूर्तीने लॉकडाऊन जाहीर केले त्याबद्दल त्याचे आम्ही स्वागत करत आहोत. मात्र पुन्हा जिल्हात लॅाकडाऊन करणे शक्य नाही. पण ज्याठिकाणी कोरोना प्रादुर्भाव हा वाढत आहे त्याठिकाणी प्रशासन योग्य ते पाऊल उचलेल. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, खोकताना रुमाल धरणे, गर्दीच्या ठिकाणी थुकू नये या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.