मुंबई: प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्यानंतर पोलिसांच्या हाती काही ओडिओ क्लिप्स लागल्या आहेत. देसाई यांच्या आत्महत्येमागे कोणाचा कट होता का? काही घातपात झाला आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
काय आहे क्लीपमध्ये: सुत्राच्या माहितीनुसार आत्महत्या करण्याआधी नितीन देसाई यांनी 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या आहेत. त्यांनी या क्लिप परिवारातील सदस्य मित्र आणि वकिलांना पाठवले आहेत. या क्लीिमध्ये देसाईंनी चार जणांसह अजून काही लोकांचे नावे घेतल्याची माहिती रायगड पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. देसाई यांचे सहाय्यक योगेश ठाकूर यांनी संबंधित ऑडिओ क्लिप वकील वृंदा विचारे यांना पाठविल्या आहेत. पोलिसांनी या क्लिप्स मिळवल्या असून त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या आहेत. देसाईंच्या आत्महत्येचा सर्व बाजूने तपास करण्यात येत असल्याचे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
लालबागच्या राजाला नमस्कार: देसाई यांची लालबागच्या राजावर प्रचंड श्रद्धा होती. यंदा लालबागच्या राजाचे 90 वे वर्ष असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही देसाई भव्य दिव्य सजावट करणार होते. त्यासाठी चार जुलैपासून तयारी सुरू केली होती. मंडपाच्या सजावटीबाबत आढावा घेण्यासाठी देसाई यांनी गेल्या रविवारी लालबाग राजा मंडळाच्या सदस्याची भेट घेतली होती. देसाई यांनी एका ऑडिओ क्लिपमध्ये लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार असे म्हटले आहे. तर दुसऱ्या क्लीपमध्ये देसाई यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
होती आर्थिक अडचण: प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई गेल्या काही वर्षांपासून आर्थिक विवंचनेत होते. देसाई यांनी 18 वर्षांपूर्वी उभारलेला एनडी स्टुडिओ गेल्या काही वर्षांपासून तोट्यात चालत होता. देसाईंवर सुमारे 252 कोटींचे कर्ज होते, अशी माहिती हाती आली आहे. कर्जाची थकबाकी आणि त्यावरील व्याजामुळे त्यांच्या कर्जतमधील भव्य एनडी स्टुडिओवर जप्तीची नामुष्की ओढावणार होती. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचून त्यांनी जीवन संपवले, अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
हे आहे आत्महत्येचे कारण: कोरोनानंतर या ठिकाणी कोणत्याही चित्रपट मालिका आणि डॉक्युमेंटरीचे फारसे शूटिंगही झाले नव्हते. त्यामुळे ते त्रासले होते. काही वर्षांपूर्वी मुंबईतील एडलवाईज असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडून त्यांनी 180 कोटींचे कर्ज घेतले होते. त्यामुळे देसाईंच्या एनडीज् आर्ट वर्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर 252 कोटींचे कर्ज झाले होते. देसाईंची कंपनी दिवाळखोरीत काढण्यासंदर्भातील याचिका एडल्ट ऍसेट्स रिकॉन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे दाखल केली होती. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने गेल्याच आठवड्यात ही याचिका दाखल करून घेतली होती. दरम्यान 7 मे रोजी त्यांच्या स्टुडिओला आग लागली होती. त्याचदिवशी त्यांना कर्ज वसुलीसाठी नोटीस बजावली गेली होती. या सर्व तणावामुळेच नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्टुडिओमध्येच होणार अंतिम संस्कार: कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्येच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली होती. खालापूर पोलिसांचे पथक, श्वान पथक आणि फॉरेन्सिकची टीम उशिरापर्यंत तपास करत होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास देसाई यांचा मृतदेह जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. चार डॉक्टरांनी नितीन देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. नितीन देसाई यांचा मृत्यू गळ्याला फास लागूनच झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. देसाई यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्येच होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. देसाई यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा दोन मुली आणि जावई असा परिवार आहे.
हेही वाचा-
- Oh My God 2 Trailer Postponed : नितीन देसाईच्या निधनामुळे 'ओह माय गॉड २'चा ट्रेलर लांबणीवर
- Nitin Desai News: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा पोस्टमॉर्टम अहवाल आला समोर, 'या' कारणामुळे झाला मृत्यू
- Nitin Desai Suicide Case : नितीन देसाईंच्या निधनाने कलाविश्वाला धक्का, आशुतोष गोवारीकरांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली