रायगड - भाषेच्या संवर्धनाची काळजी करण्यापेक्षा तिच्यावर अतिक्रमण न केल्यास भाषेची चिंता करण्याची गरज नाही, असे मत दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता नागराज मुंजळे यांनी व्यक्त केले. जागतिक मराठी अकादमीच्या शोध मराठी मनाचा या संमेलनात अध्यक्षीय भाषण देताना ते बोलत होते.
'जागतिक मराठी अकादमी शोध मराठी मनाचा' या संमेलनला मंगळवारपासून अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात सुरुवात झाली. संमेलनाचे उद्घाटनही नागराज मुंजळे यांच्या हस्ते झाले. यावेळी नागराज मुंजळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेबाबत रोखठोक विचार मांडले.
हेही वाचा - 'आईनेच दिला मराठीचा पहिला धडा'; फ्रान्सिस दिब्रिटो यांची विशेष मुलाखत
इंग्रजीचे मराठीवर आक्रमण होण्यापेक्षा मराठीचेच मराठीवर आक्रमण होत आहे. शहरात बोलली जाणारी भाषा ही शुद्ध असते, तर ग्रामीण भागातील भाषा ही गावठी म्हणून हिणवली जाते. इंग्रजी भाषा येत नाही म्हणून हिणवले जाते. मात्र, आगरी, कोकणी, मालवणी, अहिराणी या भाषा येत नसतील तर त्याबाबत कोणीही काही बोलत नाही. आपल्या स्थानिक भाषांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मराठी भाषेवर होत असलेले अतिक्रमण रोखणे ही काळाची गरज आहे, असे मत मुंजळे यांनी मांडले.
या कार्यक्रमाला जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष यशवंतराव गडाख, स्वागताध्यक्ष आमदार जयंत पाटील, विद्या जोशी, निखिल साने, वायाकॉम 18 चे प्रसाद कांबळी, मेघराज राजे भोसले, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सरचिटणीस राजीव मंत्री, माजी आमदार मीनाक्षी पाटील, चित्रलेखा पाटील हे उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल आणि डॉक्टर अनिल नेरुरकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.