रायगड - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि महाड पोलादपूरचे शिवसेना आ. भरत गोगावले हे दोघे वसुली आणि वाटपामध्ये गुंग आहेत. जिल्ह्यात कोरोनाची वाईट परिस्थिती असताना राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते स्वतःची तिजोरी भरत असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केला आहे. तर आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनही कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात कमी पडत आहे. असेही ते म्हटले.
मुरुड तालुक्यातील कोर्लई जमीन घोटाळ्याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीबाबत विचारणा करण्यासाठी किरीट सोमैया हे आले होते. त्यावेळी पोस्को कंपनीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत झालेल्या भांडणाबाबत त्यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यावर टीका केली आहे.
भंगार आहे कळीचा मुद्दा
माणगाव तालुक्यातील निजामपूर परिसरात असलेल्या पोस्को कंपनीतील भंगारावरून नेहमी वादाचे प्रसंग घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षात भंगारावरून नेहमी कलह होत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. तर 2 मे रोजी सुतारवाडी येथे महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याची कार तसेच इतर व्यावसायिकाचे ट्रक दगडाने फोडण्यात आले होते. त्यामुळे पोस्को कंपनीच्या भंगार प्रकरणाचा वाद आता रस्त्यावर होऊ लागला आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी पोस्को कंपनी प्रकरणात जिल्ह्यातील खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जशी अनिल देशमुख आणि अनिल परब याची पैशावरून भांडण होऊन वाझे प्रकरण बाहेर आले. तशीच काहीशी परिस्थिती रायगड जिल्ह्यात सुरू आहे. रायगडात कोरोना परिस्थिती गंभीर असताना तटकरे आणि गोगावले हे आपली तुंबडी भरत असल्याची जहरी टीका सोमैया यांनी दोघांवर केली आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी
जिल्ह्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. मात्र आरोग्य आणि जिल्हा प्रशासन ही परिस्थिती हाताळण्यास कुचकामी ठरले असल्याची टीका सोमय्या यांनी केली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर याची कमतरता आहे. तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बेड, व्हेंटिलेटर याची सुविधा प्रशासनाने करणे गरजेचे आहे. असेही सोमैया यांनी म्हटले आहे.