पेण (रायगड) - कोकणासह रायगड जिल्ह्याला बसलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात पेण तालुक्यातील गागोदे आदिवासी वाडी येथील रामा बाळू कातकरी यांच्या अंगावर झाड पडून मृत्यू झाला होता. तर त्यांची पत्नी सीमा कातकरी यामध्ये जबर जखमी झाल्याने या घटनेची पाहणी करण्यासाठी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी नाना पटोले यांनी सांगितले की, तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले असून घरांचीही पडझड झाली आहे. यासह मच्छिमारी करणाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून तत्काळ नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू असून लवकरात लवकर भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नैसर्गिक आपत्तीने या आदिवासी कुटुंबांवर दुःखाचे सावट पसरले आहे. ही घटना दुर्दैवी असून या कुटुंबाला राज्य शासनाच्या मार्फत लवकरच 4 लाख रुपये आणि धान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.