रायगड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठीण परिस्थितीत गेल्या दीड महिन्यापासून कोविड-19 च्या आयसोलेशन कक्षात उर्मिला पाटील या रुग्ण सेवेचे कर्तव्य बजावत आहेत. तर दुसरीकडे एक आई म्हणूनही आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. अशा या कोरोना योद्धा असलेल्या उर्मिला पाटील यांच्या कार्याचा मातृदिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला विशेष आढावा...
सीमेवर जवान शत्रूशी लढत असताना त्यांना समोर कोण शत्रू आहे याची जाणीव असते. मात्र, समोर न दिसणारा अदृश्य शत्रू आणि हातात कोणतेही शस्त्र नसताना लढायचे कसे असा बिकट प्रश्न सध्या साऱ्या जगाला भेडसावत आहे. जवान जसे सीमेवर समोर दिसणाऱ्या शत्रूशी लढत असतो. तसचे आरोग्य यंत्रणेचे सर्वजण कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी लढत आहेत. अशाच लढा जिल्हा सामान्य रुगणालयात अधिपरिचारिका असलेल्या उर्मिला दिनेश पाटील देत आहेत.
देशात सध्या कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला असताना आपले आरोग्य धोक्यात घालून देशातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र कोरोनाशी लढत आहेत. जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव झाला असून येथील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारिका या पदावर काम करणाऱ्या उर्मिला पाटील गेल्या 14 वर्ष रुग्णाच्या सेवेत आपले कर्तव्य बजावत आहेत. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव सुरू झाल्यानंतर उर्मिला पाटील यांची कोविड 19 साठी बनविलेल्या आयसोलिशन कक्षामध्ये नेमणूक झाली आहे.
कोविड-19 मध्ये काम सुरू असताना एक दडपण मनावर असले तरी आपण आपले कर्तव्य करायचे ही भावना उर्मिला पाटील यांच्या मनात कायम होती. कोरोनाबाधित तसेच संशयित रुग्णांना आयसोलेशन कक्षात ठेवले जात असून त्यांची देखभाल, काळजी करण्याची जबाबदारी डॉक्टर, अधिपरिचारिका यांच्या खांद्यावर असते. कोविड-19 मध्ये काम करीत असल्याने या विषाणूबाबत सर्व माहिती उर्मिला पाटील यांनी आधीच आपल्या दोन्ही मुलांना दिली आहे.
कोरोनासाठी करण्यात आलेल्या आयसोलेशनमध्ये काम करीत असले तरी मी आणि माझ्या मुलांची, पतीची काळजी घेत आहे. उर्मिला पाटील यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी मानसीने दहावीची परीक्षा दिली असून मुलगा उर्वश चौथीत गेला आहे. तर उर्मिला यांचे पती अलिबागमधील पीएनपी शाळेत शिक्षक आहेत. आज उर्मिला पाटील कोरोनाच्या लढाईत आरोग्य सेवेची ढाल घेऊन एकीकडे लढत असताना माता म्हणूनही कुटुंबाचीही काळजी घेत आहेत.
रुग्णालयातून सुटल्यानंतर घरी आले की आधी मुलगा उर्वश सॅनिटायझर देऊन प्रथम हात स्वच्छ करण्यास सांगतो. त्यानंतर मुलगी मानसी गरम पाणी स्नानगृहात ठेऊन अंघाळ करायला लावते. मी अंघोळ करुन आल्यानंतर मुलांना जवळ घेते असे पाटील सांगतात.
कोरोनाच्या या लढाईत मी आणि सर्व आरोग्य यंत्रणेतील परिचारिका, डॉक्टर, कर्मचारी, वार्ड बॉय नागरिकांच्या जीवाची काळजी घेत असताना आई म्हणून माझे एक मन नेहमी मुलाजवळही असते. कोविड-19 मध्ये काम करताना आपल्यालाही याची लागण झाली तर मुलाचे काय होईल अशी अनाहूत भीती मनात असली असते. तरी आरोग्य सेवेचे घेतलेले हे व्रत पूर्ण करायचे आहे. असे असताना नागरिकांनो तुमच्यासाठी मी आणि जिल्ह्याची, राज्याची, देशाची आरोग्य यंत्रणा, पोलीस, प्रशासन कुटुंबाला घरी ठेवून झटत आहोत. कोरोना सारख्या शत्रूला हरवायचे असेल तर तुम्ही घरातून बाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहनही यानिमित्ताने पाटील यांनी केले आहे.
माझी आई ही कोविड-19 च्या लढाईत आपली जबाबदारी पार पाडत आहे. ती तुमच्यासाठी कोरोना युद्धात लढत आहे. कोरोनाशी लढत असताना आम्हालाही तिच्या जीवाची काळजी वाटत असते. तर तिलाही एक अनाहूत भीती आमच्याबाबत मनात आहे. मात्र, अशा कठीण परिस्थितीत माझी आई ही एक सेवाच करीत असून मला तिचा अभिमान आहे. नागरिकांनीही कोरोनाशी लढण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेला मदत म्हणून आपण घरात बसूनच साथ द्या, असे आवाहन करुन मानसीने आईबाबत आपली भावना व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या या संकटात आरोग्य यंत्रणा आज पूर्णतः झोकून काम करीत आहेत. उर्मिला पाटील यांच्यासारख्या असंख्य माता आपल्या मुलांना, कुटुंबाला या कठीण परिस्थितीत घरी ठेवून आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा या कोविड-19 च्या कोरोनयोद्धा मातांना इटीव्ही भारतचा मानाचा मुजरा.