पनवेल- पनवेल रेल्वे स्थानक म्हटले की गर्दी शिवाय दुसरे काही डोळ्यासमोर येत नाही. त्यात सायंकाळची वेळ म्हटलं की जो तो फक्त गाडी पकडण्याच्या नादातच असतो. अचानक गर्दीमधल्या एका नवख्या प्रवाशाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आणि पनवेलकरांनी स्वतःची रोजची लोकल चुकवत काही काळ परिसरात घालवला. बघता बघता हा नवा प्रवासी सर्वांचा लाडका झाला. हा नवा प्रवासी दुसरा तिसरा कुणी नसून चक्क माकड होता.
सायंकाळी ५ च्या सुमारास लोकल पकडायला आल्याप्रमाणे हे माकड फलाटावर अवतरले आणि मर्कटलीला दाखवायला सुरुवात केली. घाई-गडबडीत असलेल्या प्रवाशांनी लोकलच्या घडाळ्याकडे न पाहता या माकडाचे खेळ पाहणं पसंत केलं. या माकडाचे वेगवेगळे हावभाव आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी तेथील प्रवाशांमध्ये स्पर्धा लागली.
प्लॅटफॉर्म नंबर ५ वरून लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस आणि मेमु लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लगबग असते. याच फलाटावरील एका भिंतीवर उभा राहून हे माकड एक्स्प्रेसची वाट बघत असल्याच्या मिश्किल प्रतिक्रिया ल प्रवाशांनी दिल्या. विशेष म्हणजे पनवेल स्थानकाची संपुर्ण माहिती असल्याप्रमाणे हे माकड बिनधास्तपणे स्टेशन परिसरात फिरत होते.
प्लॅटफॉर्मवर काही वेळ घालवल्यानंतर माकड टणाटण उड्या मारून स्टेशनच्या पायऱ्यावरील पत्र्यावर सरसर चढला. प्रवाशांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ देखील दिला. जवळपास १५ ते २० मिनिटे स्टेशनवर असलेल्या या माकडाचा सर्व प्रवाशांना लळा लागला. त्यांनतर पनवेल रेल्वे स्टेशनच्या पलीकडून त्याने मार्गक्रमण केले.