पनवेल - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीविरोधात रणशिंग फुंकले आहे. राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या भेटीगाठी पाहता उघड-उघड जरी पाठिंबा दिसत नसला तरी पनवेलमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी मनसेचे इंजिन धावणार हे आता निश्चित झाले आहे.
मावाळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी नुकतेच पनवेलमधील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांची भेट घेत पार्थ पवार यांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मी तुमच्यातलाच आहे मला सहकार्य करा, असे आवाहन केले. त्यानंतर मनसैनिक गणेश बनकर यांनी पार्थशी हस्तांदोलन करत त्यांच्या गळ्यात मनसेचे उपरणे घातले आणि ते पार्थ पवार यांनीदेखील स्वीकारले.
यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर उपस्थित सर्व मनसैनिकांनी मावळमधून केवळ आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा निश्चय केला आहे. तसेच मोदी आणि शाहंविरोधात काम करण्याची ग्वाहीही पार्थ पवार यांना दिली.
मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे राष्ट्रवादीच्यां नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहेत. मात्र, यावर त्यांनी जाहिररीत्या काहीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु पनवेलमध्ये मनसैनिकांनी जाहिररित्या राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी मनसेने पाठिंबा दिल्याने पनवेलच्या राजकारणात किती बदल होतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.