पनवेल - 'वॉटर कप' स्पर्धेत सहभागी झालेल्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये सध्या श्रमदानातून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. ग्रामस्थांना पाठबळ देण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः पारनेर तालुक्यातील हरेश्वर या गावामध्ये जाऊन श्रमदान केले. ठाकूर यांनी श्रमदान केल्याने गावातील ग्रामस्थांचा उत्साह दुणावला आहे.
ज्येष्ठ अभिनेते आमीर खान संस्थापक असलेल्या पाणी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या 'वॉटर कप' स्पर्धेत राज्यातील दुष्काळग्रस्त गावे सहभागी झाली आहेत. सध्या या गावातील तरुण, तरुणी, वृद्ध असे सर्वजण सहभागी होत आहेत. ग्रामस्थ सकाळी व संध्याकाळी श्रमदान करत आहेत. श्रमदान करणाऱ्या या ग्रामस्थांना पाठिंबा द्यावा, म्हणून आता पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे.
रणरणत्या उन्हात हातात टिकाव घेऊन खोदण्याच्या कामाबरोबरच आमदार प्रशांत ठाकूर यांनी माती देखील फेकली. आमदार प्रशांत ठाकूर हे गावात जाताना आपल्यासमवेत नगरसेवक संतोष शेट्टी, जि. प. सदस्य अमित जाधव, भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस किशोर चौतमोल, डॉ. संतोष जाधव, भाजप युवा मोर्चा नवीन पनवेल शहर सरचिटणीस विवेक होन, उपसरपंच विचुंबे किशोर सुरते यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा घेऊन गेले असल्याने तेथील ग्रामस्थांचा श्रमदानातील उत्साह आणखी वाढला आहे.
जलक्रांतीच्या या चळवळीचे साक्षीदार होण्यासाठी तरुण पिढीने गट-तट विसरून एकजुटीने दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी ठाकूर यांनी केले. अनेकजन ठाकूर यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धडपड करत होते.