रायगड - अलिबाग तालुका हा समुद्रमार्गे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. गेटवेवरून मांडवा येथे जलबोटीने अलिबागमध्ये येता येते. त्याचबरोबर रेवस मार्गे उरण मोरा करंजा हा एक जलमार्ग नवी मुंबईला जोडला आहे. अलिबाग आणि उरण तालुक्याला जोडण्यासाठी रेवस करंजा हा खाडीपूल करण्याचे स्वप्न महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री ए .आर.अंतुले यांनी पाहिले होते. या बाबत प्रश्नाला अलिबाग मुरुडचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा या महत्वाच्या प्रकल्पाला वाचा फोडली आहे. हा महत्वाचा प्रकल्प आजही राजकीय अनास्थेमुळे प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे रेवस कारंजा खाडीपुलाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आसून महाविकास आघाडी सरकार काळात या पुलाचे काम सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
अलिबाग हा पर्यटन तालुका आहे. अलिबागमध्ये येण्यास रस्तेमार्ग तसेच जलमार्गाची सुविधा आहे. मांडवा येथून मुंबईला तसेच मोरा उरण मार्गे नवी मुंबईला जाण्यासाठी जलवाहतूक सुविधा आहे. रेवस करंजा हा अलिबाग उरण तालुक्यांना जोडणारा खाडीपूल करण्यासाठी 1970 सालापासून चर्चा होती. 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी हा प्रकल्प अस्तित्वात आणण्यासाठी 300 कोटींची तरतूद केली होती. काही कामेही त्यावेळी सुरू झाली होती. मात्र, 1982 मध्ये अंतुले यांचे मुख्यमंत्री पद गेल्यानंतर हा प्रकल्प मध्येच गुंडाळला गेला.
रेवस करंजा या खाडीमधून मच्छीमारी बोटी जात असल्याने खाडीपूल बांधण्यास काही राजकीय पक्षाची हरकत असल्याने हा पूल अनेक वर्षे रखडलेला आहे. रेवस करंजा हा खाडीपूल झाल्यास अलिबागसाठी नवी दालने उघडणार आहेत. या पुलामुळे पर्यटनास अजून चालना मिळून येथील शेतकऱ्यांना वाशी बाजारात जाण्यासही सोयीस्कर पडणार आहे.
पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असल्याने अलिबाग, मुरुड करांना रेवस करंजा खाडीपुलाचा लाभ होणार आहे. तसेच या पुलामुळे नवी मुंबई, मुंबईकडे जाण्यासही वेळ कमी लागणार आहे. त्यामुळे रेवस करंजा हा खाडी पूल ठाकरे सरकार काळात निर्माण झाल्यास अलिबाग तालुक्याच्या विकासाचा तसेच पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होऊ शकते.
राजकीय आणि शासकीय अनास्थेमुळे रेवस करंजा खाडीपूल लटकल्यामुळे आजही हा महत्वाकांक्षी प्रकल्प कागदावरच राहिला आहे. एमएमआरडीएने दोन वर्षापूर्वी हा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्नही फसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून रेवस करंजा खाडीपूल कामाला चालना मिळेल अशी आशा अलिबागकराना वाटत आहे.