रायगड : सोनी टीव्हीवर सुरू असलेल्या इंडियन आइडल 2021 या रविवारी 23 मे रोजीच्या लाईव्ह शोमध्ये समालोचक आदित्य नारायण याने अलिबाग बद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी आदित्य नारायण आणि सोनी टीव्हीला अलिबागकरांची जाहीर माफी माग अन्यथा सोनी टीव्हीने पुढे होणाऱ्या परिणामांना तयार राहावे, दाखवू अलिबागकरांचा हिंसका काय असतो ते असे ट्विट करून इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अलिबागच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अलिबागला स्वतःची एक ऐतिहासिक ओळख -
अलिबाग तालुक्याला ऐतिहासिक वारसा आहे. सरखेल कान्होजी आंग्रे, जनरल अरुणकुमार वैद्य, निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी याचा वारसा लाभलेला हा तालुका आहे. अलिबागला स्वतःची अशी एक ओळख आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक अशी ओळख असलेला हा तालुका आहे. मात्र अनेक वेळा सिनेमा, मालिका, स्टेज शो, टीव्हीवरील शो यामधून अलिबागबाबत आक्षेपार्ह टीका नेहमी होत असते. अलिबाग हा पर्यटन तालुका म्हणूनही प्रसिद्ध आहे. टीका करणारेही अलिबागला पर्यटनास येत असतात. अशावेळी त्यांना या तालुक्याची भुरळ पडत असते. क्रिकेटर, उद्योगपती, राजकीय नेते, सिने कलाकार आज अलिबागचे रहिवासी आहेत. तरीही अलिबागवर टीका करणे बंद झालेले नाही.
आदित्य नारायण याने केला अलिबागचा अपमान-
सोनी टीव्हीवर सुरू असलेल्या इंडियन आइडल 2021 या गाण्याच्या शोमध्ये रविवारी 23 मे रोजी समालोचक आदित्य नारायण याने लाईव्ह कार्यक्रमात समोरच्या व्यक्तीला 'सोच समजके रागपट्टी दो, हम क्या अलिबागसे आये है क्या' असे उपरोधिक बोलून समस्त अलिबाग करांचा अपमान केला आहे. आदित्य नारायण याच्या या वाक्यामुळे पुन्हा अलिबागच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमदार महेंद्र दळवीचा ट्विटरद्वारे इशारा -
अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी याबाबत आदित्य नारायण याचा समाचार घेतला आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या ट्विटरवरून आदित्य नारायण आणि सोनी टीव्हीचा जाहीर निषेध केला आहे. 'तू कोण आहेस हे मला माहित नाही व माहीतही करून घाययचे नाही, तू अलिबागबद्दल जे बोललास त्याबद्दल जाहीर माफी माग, नसेल तर सोनी टिव्हीने पुढे होणाऱ्या परिणामाला तयार व्हावे, दाखवू अलिबागकरांचा हिसका काय असतो ते' असा सज्जड इशारा आदित्य नारायण आणि सोनी टीव्हीला दिला आहे.