रायगड - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज (शनिवारी) रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागात जाऊन ते पाहणी करणार आहेत. मुरुड काशीद येथील प्रकृती रिसॉर्टमध्ये दुपारी एक वाजता आढावा बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री हे 4 जून पासून जिल्ह्यात येत आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाचे मंत्री असलेले बाळासाहेब थोरात हे वादळ झाल्यानंतर दहा दिवसांनी जिल्ह्यात दाखल होत आहेत.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सकाळी नऊ वाजता मुंबई भाऊचा धक्का येथून रोरो बोटीने मांडवा येथे येणार आहेत. या पाहणी दौऱ्यात अलिबाग नागाव, चौल मुरुड, काशीद, दिघीबंदर, दिवेआगर, तुरूंबडी म्हसळा या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. काशीद येथील प्रकृती रिसॉर्ट येथे दुपारी एक वाजता चक्रीवादळ बाबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर दीड वाजता ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.