रायगड - उरण तालुक्यामध्ये घारापुरी बेटावर शिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी लाखो भाविक येत असतात. मात्र यावर्षी कोरोना माहामारीचे सावट पाहता हा उत्सव रद्द करण्यात आला आहे. यामुळे भाविकांना घारापुरी बेटावरील या उत्सवासाठी जाता येणार नाही.
शेकडो वर्षे चालत आलेल्या प्रथेला यावर्षी लाल कंदील -
घारापुरी बेट म्हटलं, की येथील जगविख्यात लेणी समोर येतात. या लेण्यांच्या माध्यमातून शिव विवाह सोहळा त्याचप्रमाणे भगवान शंकर यांच्या जीवन शैली दाखवण्यात आल्या आहेत. तर येथे प्रत्येक गुफेमधील असणारी शिवमंदिरे येथील शिवाचं स्थान दाखवतात. यामुळेच येथील बेटावर महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या साक्षीने साजरा होत असतो. यावेळी येथील मुख्य गुफेमध्ये असणाऱ्या शिवलिंगावर अभिषेक करून, भाविकांना मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात येतात. मात्र यावर्षी या उत्सवावर कोरोना महामारीचे सावट आहे. या उत्सवाला भाविकांना जाता येणार नाही. शेकडो वर्षे चालत आलेल्या प्रथेला यावर्षी लाल कंदील दाखवण्यात आला आहे.
कोरोना महामारी आणि वाढणारी रुग्णसंख्या पाहता खबरदारी घेणे गरजेचे असल्याने महाशिवरात्री सोहळा साधेपणाने मोजक्या लोकांमध्ये साजरा होणार आहे. येथील शिवलिंगाची परंपरेनुसार पूजाअर्चा केली जाणार आहे. तर येथे गर्दी होऊ नये आणि संसर्ग वाढु नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा सोहळा रद्द केला आहे. तर भाविकांचा लोंढा न येण्यासाठी मोरा, मुंबई, न्हावा, अलिबाग, ट्रोम्बे येथून येणाऱ्या बोटींना बंदी घालण्यात आली आहे. तर या दिवशी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
घारापुरी सरपंचांचे भाविकांना आवाहन -
घारापुरी बेटावर दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाशिवरात्री उत्सव होत असतो. मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे हा उत्सव रद्द करण्यात आला आहे. यामुळे भाविकांनी राष्ट्रीय संकट लक्षात घेऊन घारापुरी ग्रामपंचायत आणि प्रशासनाला सहकार्य करावे. यावर्षीच्या घारापुरी बेटावरील महाशिवरात्री उत्सवाला न येता आपल्या घरामध्येच शिवपूजा करून, सहकार्य करावे असे आवाहन घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी भाविकांना केले आहे.