रायगड - महाडमध्ये एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे महाड शहरात भीतीचे वातावरण आहे. पण, याबाबतचे कोणतेही गांभिर्य महाड पंचायत समिती पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना नसल्याचे समोर आले आहे. महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांचा वाढदिवस पंचायत समिती कार्यालयात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांचा आज वाढदिवस असल्याने, तो अधिकारी, राजकीय पदाधिकारी यांनी धुमधडाक्यात साजरा केला. नुसता धुमधडाक्यात साजरा न करता चक्क मटणाची पार्टीचे आयोजनही करण्यात आले होते. पंचायत समितीच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात तसेच सभापतींच्या दालनामध्ये मेजवानीच्या पंगती झोडल्या गेल्या. अधिकारी, राजकीय पदाधिकारी यांनी येथेच्छ मटणावर ताव मारून गोडांबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या पार्टीला सभापती ममता गांगण तसेच सर्व पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचे अधिकारी तसेच सर्व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम आणि शासकिय आदेशाना केराची टोपली दाखवत चक्क शासकीय कार्यालयातच पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला उपस्थित असलेल्या पदाधिकारी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच अधिका-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा अहोरात्र झटत आहेत. मात्र महाड पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कोरोनासारख्या संकटात पार्टी करण्याचा बेत आखून स्वतःवर नामुष्की ओढवून घेतली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रोहा तालुक्यातील पहुर गावच्या सरपंचाने 40 जणांना घेऊन मटणाची पार्टी आयोजित केली होती. कोलाड पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून सर्वांना अटक करून गुन्हा दाखल केला होता. महाड मधील प्रकरणात तर अधिकारी आणि पदाधिकारी हे दोन्ही असल्याने त्याच्यावर आता रायगडच्या जिल्हाधिकारी निघी चौधरी काय कारवाई करणार? याकडे आता लक्ष लागले आहे.
आज महाड पंचायत समिती कार्यालयात पाणी टंचाई आणि कोरोना विषयी आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी सोशल डिस्टनसिग ठेवून आम्ही आदेशाचे पालन केले आहे. तसेच दुपारी जेवणाची वेळ असल्याने बाहेरून जेवण आणून सर्वांनी जेवण केले. काही जणांनी जाणूनबुजून वाढदिवसाची मटणाची पार्टी केल्याचा खोडसाळपणा केला असून असे काही घडलेले नाही, असे महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत गोडाबे यांनी सांगितले.
हेही वाचा - टेलिमेडिसिन समुपदेशन सुविधा कार्यन्वित; रायगड पोलिसांसाठी अधिक्षकांनी सुरू केली योजना
हेही वाचा - माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन