रायगड - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून अलिबाग नगरपालिका प्रशासनाने शहरातील लॉकडाऊन आणखी कडक करण्याकडे भर दिला आहे. शनिवार, रविवारी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य दिवशी देखील दुपारी 1 वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवता येणार आहेत. यासदंर्भात पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची संयुक्त बैठक पार पडली.
रोज कोरोनाची होत आहे 100 पार -
अलिबाग तालुक्यात कोरोनाचा फैलाव जलद गतीने होताना दिसतो आहे. दिवसाला 100हून अधिक रूग्ण रोज आढळून येत आहेत. पनवेल महापालिकेनंतर दररोजच्या रूग्णवाढीत अलिबाग तालुक्याचा नंबर लागतो. आज शुक्रवारी 111 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात येवू शकेल.
1 वाजेपर्यंत राहणार सुरू अत्यावश्यक दुकाने -
या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संचारबंदीत सुट मिळालेल्या काही दुकानादारांमुळेच गर्दी होत असल्याबाबत चर्चा झाली. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी पालीका प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार भाजी मार्केट, फळमार्केट, मच्छिमार्केट, हातगाड्या व परिसरातील चिकन-मटण सेंटर दुपारी 1 वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी 1 वाजल्यानंतर यातील कुठलेही दुकान उघडे ठेवता येणार नाही.
'काटेकोर पालन करा'
तर शनिवार व रविवार या दिवशी केवळ वृत्तपत्र, डेअरी, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स व टेस्टिंग लॅब या आस्थापना वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले आहे.