रायगड - मुंबईकडून-श्रीवर्धन बसवरील माखनीकर या चालकाने स्थानिक नागरिकांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून बस पाच ते सहा फूट वाहत्या पाण्यात घातली होती. हा प्रकार 6 ऑगस्ट गोरेगाव येथे घडला. नागरिकांनी जीवाची पर्वा न करता पाण्यातून जाऊन बसमधील 25 प्रवासी, चालक, वाहक यांना सुरक्षित बाहेर काढले.
वाहत्या पाण्यातून वाहन टाकू नये अशा सूचना असतानाही एसटी महामंडळाच्या चालकाने 25 प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून पाण्याच्या प्रवाहात बस नेली. काही अंतर गेल्यावर बस पाण्याच्या प्रवाहसोबत वाहू लागली. मात्र सुदैवाने नाल्यातील निमुळत्या जागेत बस अडकली. स्थानिक नागरीकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
मोर्बे मार्गे ही बस श्रीवर्धनकडे जात असते. मात्र, पावसामुळे हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे चालकाने गोरेगाव मार्गे श्रीवर्धन जाण्याचा बेत आखला. गोरेगावमध्येही पाणी साचले असल्याने पुढे जावू नका, असा सल्ला चालकाला दिला होता. मात्र त्याकडे चालकाने दूर्लक्ष केले होते.
या सर्व प्रकारावर 'प्रवाशांचा जीव घोक्यात घालून चालकाने बस पाण्यात घातली. त्यामुळे या बसच्या चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल' अशी प्रतिक्रीया विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली आहे.