रायगड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील दारूची दुकाने, बार तातडीने बंद करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत. याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. या आदेशाचे सामान्य नागरिकांकडून स्वागत होत असले तरी तळीरामांचा हिरमोड झाला आहे.
जीवघेण्या आजारापासून रोखण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या आदेशांची रायगड जिल्हा प्रशासनातर्फे कडक अंमलबजावणी सुरू आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वेगवेगळया उपाययोजना सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता बार देखील बंद करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे दारूची दुकानेदेखील बंद करण्याचे फर्मान आज जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे बारमध्ये होणारी गर्दी आपोआप टळणार आहे. या निर्णयाबद्दल सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, यामुळे दररोज पिण्याऱ्यांची अडचण होणार आहे. दारूची दुकाने, बार उघडे दिसले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ही बंदी 31 मार्चपर्यंत लागू असणार आहे. मात्र, काही ठिकाणी चोरट्या पद्धतीने दारूची विक्री केली जाते ती रोखण्याचे आव्हान पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागासमोर असणार आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी -
सार्वजनिक कार्यक्रम, सभा, समारंभ यातून कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याने कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार हॉटेलमधील हॉल, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृह याठिकाणी लग्न समारंभ, धार्मिक व सामाजिक उपक्रम घेता येणार नाहीत.
289 जण देखरेखीखाली -
रायगड जिल्ह्यात 1 मार्चपासून 327 लोक विदेशातून आले आहेत, तर 13 मार्चपासून विदेशातून आलेल्यांची संख्या 180 इतकी आहे. त्यातील 19 जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत 197 जण त्यांच्याच घरात देखरेखीखाली आहेत. तर 92 जणांना विलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एकच कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत.