उरण (रायगड) - तालुक्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी काही दिवस प्रचंड वाढत होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून ही आकडेवारी कमी येण्यास सुरुवात झाली आहे.
शनिवारी आलेल्या अहवालामध्ये 59 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 56 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे उरणकरांना ही बातमी दिलासा देणारी आहे. मात्र, काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.
नागरिकांना दिलासा देणारी बातमी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्याचे नियोजन चुकीचे असल्याचे जाणकारांचे मत असले तरी, काही दिवसांपूर्वी झपाट्याने वाढणाऱ्या रुग्ण संख्येची आकडेवारी मागील दोन दिवसांमध्ये कमी होण्यास सुरुवात झाली आहे. उरण तालुक्यामध्ये दररोज 60 ते 70 बाधित रुग्ण आढळून येत असल्याने येथील अपुऱ्या व्यवस्थेमुळे बाधितांच्या रुग्णसेवेमध्ये अडचणी येत आहेत. तर येथील कोव्हिड केंद्राच्या खाटांची संख्या कमी असल्याने येथील रुग्णांना पनवेल, नवी मुंबई आणि मुंबई येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी जावे लागत आहे. यामध्ये गरीब आणि निराधार असणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. मात्र, मागील दोन दिवसांपासून बाधितांची आकडे कमी येण्यास सुरुवात झाली असल्याने, येथील नागरिकांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे.
शनिवारी आलेल्या अहवालात 59 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आनंद व्यक्त होत आहे. मात्र, एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने येथील मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. आजवर उरण तालुक्यामध्ये बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 3219 इतकी झाली आहे. पूर्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2651 इतकी आहे. तर 434 विद्यमान रुग्ण तालुक्यामध्ये असून, आजवर 134 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बाजारात होणारी गर्दी ही चिंतेची बाब -
मागील दोन दिवसांमध्ये बाधितांच्या आकडेवारीमध्ये घट झाली असली तरी उरणच्या बाजारामध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी ही चिंतेची बाब आहे. यासाठी नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे असून, आवश्यक असल्याचे बाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये. विनाकारण बाहेर पडल्यास कायदेशीर आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सांगण्यात येत आहे.