रायगड - जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दमदार सुरुवात केली. त्यानंतर शेतकऱ्यांनाही भात लावणीच्या कामाला सुरुवात केली. जिल्ह्यातील नद्या, धरणेसुद्धा तुडूंब वाहू लागल्या आहेत. मात्र, चार दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत.
पावसाने जून महिन्यात जोरदार सुरुवात केली. त्यानंतर रायगडकर पावसामध्ये चिंब झाले होते. पावसाने अंबा, सावित्री, उल्हास, या नद्याही तुडुंब वाहू लागल्याने काही प्रमाणात जिल्ह्यात पूर परिस्थितीही निर्माण झाली होती, अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या होत्या. तसेच जिल्ह्यातील धरणेही पूर्णपणे भरली आहेत.
चार पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असल्याने सूर्यदर्शन होत आहे. मात्र, त्याचबरोबर उन्हाचे चटकेही जाणवू लागल्याने वातावरण गरम झाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिट प्रमाणे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. त्यामुळे पावसाने पुन्हा सुरुवात करावी, यासाठी रायगडकरांचे डोळे आकाशाकडे लागून राहिले आहेत.
जिल्ह्यात 19 जुलैपर्यंत 25419.93 मिमी पाऊस पडला असून सरासरी 1588.75 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 2018 च्या तुलनेत 500 मिमी पाऊस कमी पडला आहे. आज 20 जुलैला जिल्ह्यात फक्त 45 मिमी पाऊस पडला असून सरासरी 2.81 मिमी पावसाची नोंद झाली आहे.