रायगड - तळा तालुक्यातील वाशी गावातील एका गर्भवती महिलेला पोलीस महिला कर्मचारीने रुग्णालयांत पोहोचवले. चक्रीवादळामुळे रस्त्यावर झाडे, विजेचे पोल पडून रस्ते बंद झाले होते. ते बाजूला सारून आरती मंदार राऊत या पोलीस कर्मचारी महिलेने परिस्थितीची जाणीव ओळखून गर्भवतीला आपल्या खासगी वाहनातून म्हसळा येथील राऊत रुग्णालयात सुखरूप पोहचविले आहे. आरती राऊत हिच्या या मदतीने महिलेच्या कुटूंबियांना तिचे आणि तिचे पती मंदार राऊत यांचे आभार व्यक्त केले आहे.
जिल्हा पोलीस दलात असलेल्या अलिबाग शहरातील आरती मंदार राऊत या महिला कर्मचारी श्रीवर्धन येथे कर्तव्य बाजवण्यास 4 जून रोजी आपल्या पतीसोबत आपल्या खासगी वाहनाने निघाल्या होत्या. 3 जून रोजी चक्रीवादळाने रस्त्यावर झाडे, विजेचे खांब पडले होते. राजपुरी येथील बोटसेवा वादळामुळे बंद असल्याने त्या पती मंदार राऊत यांच्यासह तळा मार्गे श्रीवर्धनकडे जाण्यासाठी निघाल्या. तळा तालुक्यातील वाशी या गावात रस्त्यावर काही महिला वाहने थांबविण्याचा प्रयत्न करीत होत्या. राऊत यांची गाडी थांबवून एका महिलेस प्रसूती कळा सुरू असून तिला म्हसळा येथे रुग्णालयात नेण्याबाबत विनंती केली. रस्त्यावर झाडे, पोल पडले असताना कोणीही वाहने नेण्यास तयार नव्हते. ही परिस्थिती पाहून राऊत दाम्पत्य गरोदर महिलेस आणि तिच्या दोन नातेवाईकांना आपल्या कारमध्ये बसवून म्हसळा येथे निघाले.
दरम्यान चक्रीवादळाने रस्त्यावर झाडे, विजेचे पोल पडल्याने पुढे जायचे कसे हा यक्षप्रश्न निर्माण झाला होता. मात्र अशा परिस्थितीत मंदार राऊत यांनी रस्त्यावर पडलेले झाडे, पोल महिलेच्या अन्य नातेवाईकांच्या मदतीने बाजूला करून रस्ता मोकळा करीत म्हसळा येथील राऊत रुग्णालय गाठले आणि त्या महिलेस सुखरूप रुगणालायत दाखल केले. महिलेच्या पोटातील मूल हे खाली सरकल्याने एकीकडे तातडीने रुगणालायत पोहचणे गरजेचे असताना रस्त्यावर पडलेली झाडे, पोल काढून आणि खड्डे चुकवीत आम्ही त्या महिलेस सुखरूप रुगणालायत दाखल केले, असे मंदार राऊत यांनी सांगितले.
राऊत दाम्पत्यानी परिस्थितीची जाणीव ओळखून तातडीने समोरच्या संकटाला तोंड देत गरोदर महिलेस सुखरूप पोहचविले. अन्यथा या चक्रीवादळाच्या संकट काळात महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. राऊत दाम्पत्याच्या मदतीने एका गरोदर महिलेचे प्राण वाचले.