पनवेल - शहरात जागोजागी साचलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे सिडको नेहमीच चर्चेत असते. आता शहरातील कामोठे भागात मोकळ्या जागेवर वाढलेले गवत आणि झाडेझुडपे काढण्यास पुरेसा वेळ नाही, अशी उडवाउडवाडी उत्तरे देताना सिडको दिसत आहे. सोमवारी झालेल्या जोरदार पावसानंतर शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मोकळ्या जागांवर गवत आणि झाडेझुडपे वाढली आहेत. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि झाडेझुडपांवर डासांची उत्पत्ती होत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे कामोठेतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी २०१६ रोजी दिल्लीच्या राजपथावरुन स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. देवालयाच्या आधी शौचालये बांधा, असे त्यांनी सांगितले. अभियान चार वर्षाचा टप्पा पार करत असतांना पंतप्रधानांनी या अभियानाच्या या जबाबदारीतुन लालफितीचा कारभार सांभाळणाऱ्या सरकारी साहेबांना वगळल्याचे दिसत आहे. कामोठे मधील सेक्टर 36 इथे सिडकोचे भूखंड क्रमांक 52, 38ए, 32, 39 या जागेवर भूखंड हे वापरात नसल्यामुळे ओस पडून आहेत. सिडकोचे हे भूखंड आता अस्वच्छतेचे आगार बनत चालले आहेत. या मोकळ्या प्लॉटवर झाडे झुडुपे गवत वाढलेले असते. मोकाट जनावरांचा तिथे सारखा वावर असतो. या मोकळ्या प्लॉटमध्ये गटारीचे पाणी, पावसाचे पाणी साचून राहते. त्यातून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव होत असतो. मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांना या अस्वच्छतेकडे लक्ष देण्यास वेळ नाही.
पनवेल महापालिका झाली असली तरी भूखंडाची मालकी अद्याप सिडकोकडे आहे. शहरात सगळीकडे खुल्या भूखंडांचे डंपिंग ग्राउंड झाल्याने आजूबाजूला राहणार्या नागरिकांना यातून दिलासा देण्यासाठी सिडकोने लवकरात लवकर उपाययोजना करून हे गवत आणि झाडेझुडपे काढून टाकाव्यात, अशी मागणी पनवेल काँग्रेस उपाध्यक्ष संतोष चिखलकर यांनी केली.
सिडकोचे कार्यकारी अभियंता यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून ते प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तर देत आहेत व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. एकीकडे 'एक कदम स्वच्छता की ओर' म्हणत राष्ट्रीय अभियानाच्या प्रगतीसाठी प्रत्येक भारतीयांनी आपला परिसर, गांव आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता आहे. मात्र पंतप्रधानांची ही अपेक्षा सरकारी बाबुंना हे अभियान कागदोपत्री राबवण्यातच रस दिसत आहे.