रायगड - राज्य परिवहन महामंडळाचे वाहक आणि चालक यांना वेतन न दिल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करत आहेत. या प्रकरणी ठाकरे सरकार आता कोणाला जेलमध्ये मध्ये टाकणार? असा सवाल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात अर्णब गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत रायगड पोलिसांनी केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीला माजी खासदार किरीट सोमय्या हे उपस्थित राहिले आहेत. अर्णबबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक यांना गेल्या सात महिन्यापासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे चालक, वाहक हे आत्महत्या करीत आहेत. ठाकरे सरकारमुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ असल्याची सुसाईड नोट चालक, वाहक यांनी लिहुन ठेवली आहे. मग आता या प्रकरणात कोणाला जेलमध्येा टाकणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना की परिवहनमंत्री अनिल परब यांना? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
अन्वय नाईकला पैसे न दिल्याने अर्णवला जेल-
अन्वय नाईक याने आणि त्याच्या आईने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अन्वय नाईक याने अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख याच्या नावाची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामुळे अर्णव गोस्वामीला जेलमध्ये टाकले आहे. त्यामुळे चालक वाहक आत्महत्येसाठी कोणाला जेलमध्ये टाकणार? असे सोमय्या यांनी प्रश्न विचारला आहे.
जळगावात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या-
थकीत वेतन आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान, जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव आगारात वाहक म्हणून सेवारत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी आत्महत्या करणाऱ्या वाहकाने चिठ्ठी लिहलेली आढळून आली आहे. त्यात या परिस्थितीला मराठी माणसाचे ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.