रायगड - दुर्मिळ वन्यप्राणी असलेल्या खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या एकाला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली. कल्पेश गणपत जाधव (वय २८) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून जवळपास 7 किलो वजनाचे खवले मांजर पोलिसांनी हस्तगत केले.
औषधी गुणधर्मासाठी प्रचलित असलेल्या खवल्या मांजराच्या विक्रीसाठी एकजण पनवेलमधल्या आसूडगावजवळ येणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांच्या पथकाने आसूडगावजवळ सापळा रचून या आरोपीला रंगेहाथ पकडले. लाल रंगाच्या टाटा सुमोमधून त्याने हे खवल्या मांजर विक्रीसाठी आणले होते. याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तस्करीची कबुलीही दिली.
पनवेलमध्ये असलेल्या जंगल भागात गेल्या काही वर्षांत वन्यप्राण्यांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पनवेलच्या आजूबाजूला असलेल्या एका आदिवासी पाड्यातून त्याने हे खवल्या मांजर 40 हजाराला विकत घेतले होते. त्यानंतर हेच खवल्या मांजर जास्त किंमतीला दुसऱ्याला विकण्यासाठी तो आला असल्याची माहिती त्यानी पोलिसांनी दिली. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू असून खवल्या मांजरांची तस्करी करणारी टोळी आहे का? याचाही तपास सुरू आहे.
यासाठी होते खवल्या मांजराची तस्करी -
तोंडात एकही दात नसलेला हा प्राणी आकर्षक वाटतो. मुंग्या आणि त्यांच्या अळ्या खाऊन जगणारा हा सस्तन प्राणी दुर्मिळ होत चालला आहे. कॅन्सर सारख्या आजारावर औषध बनवण्यासाठी मांजराच्या शरिरावर असलेल्या खवल्यांचा वापर केला जातो. त्यामुळे या प्राण्याची तस्करी केली जाते.