रायगड - खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील 5 गावे दत्तक घेऊन नवा उपक्रम चालु केला आहे. त्याची सुरुवात दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी माडप गावापासून झाल्याने खालापूर पोलीस ठाण्याच्या नव्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
खालापूर पोलीस ठाण्याचा नवा उपक्रम -
याबाबत खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी आपले मत मांडताना म्हटले की, गाव पातळीवर बीट अंमलदार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस पाटील यांचेसह ग्रामकृती दलाची स्थापना करून कोरोना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी व त्याबाबत घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.
पोलीस ठाण्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपाययोजना खालीलप्रमाणे -
1) गावातील सर्व नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत असून त्यांची ऑक्सिजन व थर्मल स्क्रीनिंग तपासणी करण्याचे काम सुरू आहे.
2) गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांची संपर्क करून आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवण्याचे उपाय योजना राबविण्यात येणार आहेत.
3) स्थानिक प्रशासनाच्या मदतीने 18 ते 45 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तसेच कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधीने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांसाठी उपचार सुविधा राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
4) निराधार महिला, एकाकी राहणारे ज्येष्ठनागरिक, दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.
5) गावातील भाजीपाला विक्री व किराणा दुकानाचे ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी रोखण्यासाठी व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर या नियमाचे पालन करून अत्यावश्यक वस्तू वितरण याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे.
अशा पद्धतीने संपूर्ण कोरोना कालावधीत दक्षता घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितले.
दत्तक घेतलेल्या गावांची नावे -
1.माडप, 2.नारंगी, 3.भिलवले, 4.शिरवलीवाडी, 5.केलवली