रायगड- कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सध्या राज्यात संपूर्ण लॉकडाऊन सुरू आहे. त्यामळे खबरदारी म्हणून वडखळ, साळाव येथे असलेल्या जेएसडब्लू कंपनीत पनवेल, नवी मुंबई, वाशी या ठिकाणावरुन येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घरीच राहण्याच्या सूचना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केल्या आहेत.
पनवेल परिसर वगळता रायगड जिल्ह्यात इतरत्र कोठेही करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. ही चांगली बाब आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
हेही वाचा- #लाॅकडाऊन: वाहतूक ठप्प..! राज्यातील वाहनचालकांवर उपासमारीची वेळ
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील जेएसडब्ल्यू स्टिल लि.कंपनीचे डोलवी-पेण व साळाव-मुरुड येथील प्लँट सुरू आहेत. या कंपनीमध्ये काही स्थानिक कामगार आहेत तर काही कर्मचारी, कामगार नवी मुंबई, वाशी, पनवेल व इतर ठिकाणांवरुनही कामावर येत आहेत. कामाच्या ठिकाणी या कामगारांचा एकमेकांशी संपर्क येत आहे. त्यामुळे अनेक कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकही त्यामुळे भयभीत झाले आहेत. कंपनीमध्ये काम करीत असताना, करोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे जरी पालन करण्यात येत असले तरी काही वेळा त्यांची योग्य अंमलबजावणी होईलच, अशी खात्री कामगारांना नाही. त्यामुळे कामगारांमध्ये दिवसेंदिवस चिंता वाढत आहे.
वाशी, पनवेल, नेरुळ, नवी मुंबई येथून कंपनीमध्ये येणाऱ्या कामगारांनी सुध्दा स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. नवी मुंबई परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने लॉकडाऊनच्या काळात त्यांनीही आपल्या घरी थांबणे, त्यांच्यासाठी व त्यांच्या परिवारासाठी हितकारक आहे.
जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचीही या विषयी त्वरित निर्णय घेण्याविषयीची मागणी असल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्री तसेच राज्यमंत्री, उद्योग व खनिकर्म या नात्याने आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना लेखी पत्राद्वारे जिल्ह्यासह, राज्यातील अशा कंपन्यांमध्ये काम करीत असलेल्या स्थानिक कामगार व इतर कामगार यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांना घरीच राहण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, असे कळविले आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगडकरांना आश्वस्त केले आहे.