रायगड - अनंत गीते यांना मी आरडीसीसी बँकेचा चेअरमन करतो. त्यांनी यावे आणि चौकशी करावी, असे जाहीर आव्हान शेकापचे सरचिटणीस व आरडीसीसी बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी गीते यांना दिले आहे.
२८ मार्चला अलिबाग येथील शिवसेना मेळाव्यातील भाषणात युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यावर आरडीसीसी बँकेतील भ्रष्टाचाराबाबत भाष्य केले होते. बँकेतील भ्रष्टाचाराबाबत लक्ष घालून रान उठवणार, असे त्यांनी म्हटले होते. गीतेंच्या या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी आघाडीच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आता गीते विरुद्ध पाटील असा कलगीतुरा सुरू राहणार हे नक्की.
जयंत पाटील म्हणाले की, देशातील मॉडेल बँक म्हणून ही बँक उभी केली. सुनील तटकरे यांनीही अनेक वेळा चौकशा केल्या. बँकेचे कागदही फाटले पण काही भेटले नाही. या जाहीर सभेत मी गीते यांना आव्हान करतो, की मी २५ वर्ष बँकेचा चेअरमन असून गीतेंनाच बँकेचा चेअरमन करतो. त्यांनी यावे आणि चौकशी करावी. मला त्यात काही वाटत नाही. या बँकेचा एक दगडही हलू शकणार नाही, अशी ही भक्कम केलेली आहे. ज्यांनी सहकार क्षेत्रात काम केले नाही त्यांना कोणताही बोलण्याचा अधिकार नाही, असेही पाटील यांनी म्हणाले.