अर्णब यांना जेल अधीक्षकांनीच दिला मोबाईल; निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांचा आरोप - anway nike case
अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत असताना जिल्हा कारागृह अधीक्षक ए टी पाटील यांनीच आपला स्वतःचा मोबाईल बोलण्यासाठी दिला होता. मात्र, आम्ही विरोध केल्याने उलट आमच्यावरच निलंबनाची कारवाई केली असल्याचा आरोप सुभेदार अनंत भेरे आणि जेल पोलीस सचिन वाडे यांनी केला आहे.

रायगड - राज्यात सध्या जामिनावर बाहेर आलेल्या अर्णब गोस्वामी यांना कारागृहात मोबाईल उपलब्ध करून दिलेल्या प्रकरणावरही चर्चा होत आहे. अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत असताना जिल्हा कारागृह अधीक्षक ए टी पाटील यांनीच आपला स्वतःचा मोबाईल बोलण्यासाठी दिला होता, असा आरोप निलंबित करण्यात आलेल्या सुभेदार अनंत भेरे आणि जेल पोलीस सचिन वाडे यांनी केला आहे. ए टी पाटील यांनी आम्हाला बळीचा बकरा केला असल्याचेही दोघांनी म्हटले आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी मोबाईल प्रकरणात जिल्हा कारागृह अधीक्षक ए टी पाटील याच्यावर संशयाची सुई निर्माण झाली आहे.
मोबाईल आणि इतर सुविधा पाटील यांनी पुरविल्या आणि कारवाई आमच्यावर
अर्णब गोस्वामी यांना मोबाईल, बिसलेरी, बिछाना, ओडोमास या सर्व गोष्टी जिल्हा कारागृह अधीक्षक ए टी पाटील यांनीच पुरविल्या असून त्याच्यावरच कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र आमच्यावर कारवाई केली आहे. अशी प्रतिक्रिया सुभेदार अनंत भेरे यांनी दिली आहे.