रायगड (खालापूर) - सध्या कोरोना परिस्थितीचे सावट सर्वत्र पसरले असताना पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचा देखील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. यातच MMRDA अंतर्गत माथेरान नगरपरिषद हद्दीत अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. याचाच फायदा घेत काहींनी आपल्या उदरनिर्वाहासाठी या कामांमध्ये लागणारे बांधकाम साहित्य पुरवण्यासाठी येथे जवळजवळ 500 ते 600 घोड्यांचा वापर करण्यात येत आहे. तसेच मालवाहतुकीसाठी जखमी घोड्यांचा देखील वापर करण्यात येत आहे. त्यांच्या पाठीवर तीनशे ते चारशे किलोचे वजन लादून मरेपर्यंत त्यांची पिळवणूक करण्याचा प्रकार येथील मालवाहतूकदारांकडुन सर्रासपणे होताना पाहायला मिळत आहे.
या प्रकारामुळे घोड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कित्येक घोड्यांना वेळेवर पोटभर खाद्य व पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे मालवाहतूक करण्यासाठी सदर घोडे सक्षम नाहीत.
स्थानिक प्रशासन व प्राणी मित्र संघटनांचा मात्र याकडे कानाडोळा त्यातच पर्यटकांना सवारी देणाऱ्या घोड्यांना देखील काही बाहेरील अश्व चालकांनी माल वाहतूकीसाठी जुंपल्याने येथील घोड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. तर प्रशासनाकडून मालवाहतूक घोड्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी कोणतीही कारवाई करत नसल्याने आधीच कोरोनाशी झुंजत असलेल्या माथेरानकरांना भविष्यात घोड्यांपासून होणार्या ग्लेंडरसारख्या महाभयंकर आजारांचा सामना करावा लागू नये तसेच या बाहेरील घोड्यांसोबत सरा या रोगाची साथ येऊन येथील घोडे या संसर्गामुळे बाधीत होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून या मालवाहतूक घोडे धारकांना अभय मिळत असल्याचे दिसून येते आहे. संख्येत वाढ झालेल्या घोड्यांच्या निवार्यासाठी वनजमिनींवर देखील ठिकठिकाणी अतिक्रमणे होत आहेत. मोठमोठ्या झाडांना घोड्यांच्या मलमुत्रामुळे हानी पोहचत असल्यामुळे येथील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱहास होतोय तर सदर प्रकाराबाबत मात्र प्राणी मित्र संघटना व स्थानिक प्रशासन गांधारीच्या भुमिकेत आहेत. याकरिता राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तू तसेच बांधकाम मालवाहतूकीसाठी लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे असा देखील माथेरानकरांकडून सूर उमटत आहे.