उरण - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत चालला आहे. उरणमध्येही अनेक तरुणांना कोरोनाची बाधा होऊन जीव गमवावा लागला आहे. आज कोरोनाच्या आलेल्या रिपोर्टमध्ये ९७ जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे उरणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावोगावी नागरिकांची कोरोना तपासणी करणे आवश्यक
लॉकडाऊन असूनही गावोगावी कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्यानेच प्रादुर्भाव वाढत चालला आहे. प्रशासनही याची दखल घेताना दिसत नाही. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स याचे पालन करणे बंधनकारक असतानाही ते होताना दिसत नाही. त्यात गावोगावी लग्न सोहळा, सण व इतर सामाजिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असते. त्यावेळी नियमांचे उल्लंघन सर्रासपणे होताना दिसते. त्याचे विपरीत परिणाम काही दिवसानंतर दिसू लागतात. तसेच काहीजण आजार लपवत आहेत व उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. मग एकदम त्रास जाणवू लागल्यानंतर धावाधाव करण्यास सुरुवात करतात. प्रशासनाने गावोगावी ग्रामपंचायतींच्या मदतीने त्यांच्यावर जबाबदारी देत गावेगावी माणसांची तपासणी करणे आवश्यक बनले आहे.
ज्यांना त्रास जाणवत असेल त्यांना पुढील उपचारासाठी पाठवणे गरजेचे आहे. प्रशासनाबरोबर जनतेची तेवढीच जबाबदारी आहे. परंतु तालुक्यातील अनेक गावातील नागरिक मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स यांचे पालन करीत नसल्यामुळेही उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेले दोन तीन दिवसांपासून कोरोनाची आकडेवारी कमी होती. परंतु मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील तरुणांचा समावेश जास्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सर्वांनीच जबाबदारीने वागणे गरजेचे बनले आहे.