रायगड- दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त, सुजलाम, सुफलाम, हिरवागार, भगवा, सुरक्षित, सुशिक्षित महाराष्ट्र आपल्याला घडवायचा असून शिवशाही आणायची आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. लोकसभेनंतर ज्यांनी शिवसेनेला मतदान केले त्या जनतेचे, शिवसैनिकांचे तसेच अज्ञात हाताचेही मला आभार मानून आशीर्वाद घ्यायचे आहे. यासाठी ही 'जन आशीर्वाद' यात्रा राज्यभर काढली असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे.
जन आशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा रायगड येथे सुरू झाला आहे. त्याअनुषंगाने आज शिवसेनेतर्फे अलिबाग येथील क्षात्रोक्य समाज हॉलमध्ये विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जमलेल्या शिवसैनिकांसमोर आपले विचार व्यक्त केले.
जन आशीर्वाद यात्रा ही निवडणुकीची यात्रा नाही. लोकसभेत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले, प्रचार केला तसेच ज्या अज्ञात हातांनी मतदान केले, मतदान नाही केले त्यांचे आभार मानून आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. साडेचार हजार किलोमीटर फिरलो असलो तरी मी ते किलोमीटर मोजत नाही तर जिल्हा, तालुका, शहर, गाव, शेत, जनतेच्या घरी जात आहे, ते मी मोजत आहे. शिवशाही राज्यात आणण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केले आहे.
हेही वाचा- रायगडात राष्ट्रवादीचे काटे फिरले; विजयराज खुळेंची घड्याळ सोडून धनुष्याला साथ
समाजातील जातीपातीचे भेदभाव, धर्माचे भेदभाव, राजकीय विचारसरणीचे भेदभाव बाजूला ठेऊन आपल्याला एकसाथ नव्या विचारसरणीचा महाराष्ट्र घडवायचा आहे. यासाठी मला तुमची साथ हवी आहे. आज यात्रेनिमित्त फिरताना अनेक ठिकाणी ओवाळणी केली जाते, हार घातले जातात पण त्याचबरोबर जनता आपल्या समस्येचे निवेदन ही मला देत आहेत. लोक मला आपला माणूस म्हणून मानत असल्याने त्यांच्या समस्येचे निवेदन ते मला देत आहे. त्यामुळे माझी जबाबदारी वाढली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी भाषणात म्हटले आहे.
यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार सचिन अहिर, संपर्कप्रमुख विलास चावरी, जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, सह संपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हाप्रमुख किशोर जैन, तालुका प्रमुख राजा केणी, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.