रायगड - कोरोनामुळे सध्या सर्व जग थांबले असले तरी शेती व्यवसाय आजही तेवढ्याच जोमाने सुरू आहे. आज देशात सध्या आरोग्य यंत्रणा, शासकीय यंत्रणा याचबरोबर शेतकरी राजा हा आपल्या जमिनीत मेहनत घेऊन या संकटकाळात धान्य, भाजीपाला पिकवत आहे. जिल्ह्यातही शेतकरी पुन्हा जोमाने शेती करण्यास सज्ज झाला असून शासनाकडून शेतीला लागणारे खत, बियाणे याची तरतूद कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी 17 हजार क्विंटल खत शेतीसाठी वापरले जाते. यावर्षी 4 हजार 500 क्विंटल खत जादा असे 21 हजार 500 क्विंटल खत मागविले आहे, तर आतापर्यत 9 हजार क्विंटल खत हे कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना वितरित केले गेले आहे. कोरोनामुळे काम बंद असल्याने चाकरमानी हे गावी आले असल्याने काही प्रमाणात त्यांचा शेतीकडे कल वाढणार असल्याने आधीच खताचा जादा पुरवठा मागविण्यात आले असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातून लाखो नागरिक हे मुंबई, ठाणे शहरात कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. मुंबईत वाढत्या कोरोना बाधितांमुळे लाखो चाकरमानी हे पायी चालत आपल्या गावी दाखल झाले आहेत. तर आता शेतीची कामेही सुरू झाले असल्याने शेतात मशागत, राब भाजणे ही कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे आलेले चाकरमानी हे सुद्धा आता पुन्हा शेती व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. कोरोना सारखी महामारी आली असल्याने अनेक चाकरमानी हे आता पुन्हा शहरात जाण्यासाठी धजावणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात शेती लावण्याकडे कल वाढला जाणार असून पुन्हा एकदा रायगड हा भाताचे कोठार म्हणून आपली ओळख निर्माण करू शकणार आहे.
जिल्हा कृषी विभागानेही नागरिक आता शेतीकडे पुन्हा वळणार असल्याची बाब लक्षात घेऊन शेतीसाठी लागणाऱ्या खताची कुमक वाढवली आहे. दरवर्षी जिल्ह्यात 17 हजार क्विंटल खत हे शेतीसाठी वापरले जात असे. मात्र यावेळी कोरोनामुळे चाकरमानी हे आपल्या गावी आल्याने अनेक चाकरमानी हे पुन्हा शहरात लवकर जाणार नाहीत. पावसाळा जवळ आला असून भातशेतीची कामे सुरू झाली आहेत. गावात चाकरमानी आले असून सध्या हाताला काम नसल्याने आपल्या असलेल्या जमिनीत शेती करण्याची त्यांनी तयारी केली आहे. त्यामुळे भातशेतीसाठी लागणारे खत कमी पडू नये यासाठी आगाऊ जादा खताची मागणी कृषी विभागाने केली आहे.
कोरोनामुळे पुणे, मुंबई बाजारातून येणारी भाजीही बंद असल्याने जिल्ह्यातील शेतकरीच भाजी उत्पन्न घेऊन विकत आहेत. त्यामुळे चार पैसे जादा मिळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हा अजूनही वाढत असल्याने बाहेरील भाजीपाला येणे शक्य होत नाही. तसेच भात शेतीची कामेही आता सुरू झाल्याने त्याबरोबर भाजीपाला पीकही यावेळी शेतकरी घेण्याची शक्यता आहे. तर गावी आलेल्या चाकरमान्यानी सुद्धा आता आपल्या पडीक जमिनीत शेती करण्याची तयारी केली असल्याने रायगड जिल्हा हा पुन्हा शेतीमुळे सुजलाम सुफलाम होण्यास सुरुवात होऊ शकते.