रायगड - कोरोना संकटामुळे सध्या देशाची आर्थिक स्थिती कोलमडत चालली असताना गृहिणीचे बजेटही कोलमडले आहे. कोरोनामुळे सध्या जीवनावश्यक वस्तूचे भावही रोज चढउतार होत असल्याने सर्वसामान्याचे हाल होत आहेत. आधीच कमाई कमी झाली असून त्यात वाढत असलेले भाजी, तेल, डाळी यांच्या दरवाढीमुळे गृहिणीला घर कसे चालवायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटात सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक चाट सहन करावा लागत आहे.
कोरोना संकटामुळे अत्यावश्यक सेवाची वाहतूक सुरू असली तरी बाजारात येणारा भाजीपाला, कडधान्य, तेल याची आवक काही प्रमाणात ही घटलेली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू बाजारात मिळत असल्या तरी वाहतुकीवरील वाढलेला खर्च आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे भाव ही वाढले आहेत. जिल्ह्यात वांगी, भेंडी, पालेभाजी, टॉमेटो, मिरच्या ह्या भाज्या पिकत असल्याने याचे भाव स्थिर आहेत. मात्र, बाहेरून येणारी मटार, फरसबी, कोबी, फ्लॉवर ह्या भाज्यांचे भाव हे किलोमागे 140 रुपये झाले आहेत. त्यामुळे भाज्या खरेदी करताना गृहिणींना काटकसर करावी लागत आहे.
भाजीपाल्याचे दर वाढले असताना डाळींच्या दरात ही चढउतार सुरू आहे. खाद्य तेलाचीही परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे जेवणाची फोडणीला लागणारे तेलही आता भाऊ खाऊन गेलं आहे. एकीकडे कोरोनामुळे कामे बंद आहेत. काहींची कामे ही घरातून सुरू आहेत. मात्र तरीही पगारात कपात होत आहे. तर हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला असून वाढलेल्या जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीमुळे सर्वसामन्यांचे कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक वस्तूची आवक बाजारात होत असली तरी वाढलेल्या दराचा फटका हा सगळ्यांनाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटात एकीकडे जीवाची भीती ही आहे तर दुसरीकडे स्वयंपाक घरातील बजेट कसे सांभाळायचे हा प्रश्नही गृहिणींना आता सतावत आहे.