रायगड - सण, आंदोलन, मोर्चा, बंदोबस्त, निवडणुका या काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड दलाचे जवान आपले कर्तव्य बजावत असतात. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीतही होमगार्ड जवान पोलिसांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यामुळे, होमगार्ड दलातील जवानही कोरोना काळात कोरोनयोद्धा म्हणून आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.
होमगार्ड दलातील सहा जण कर्तव्य बजावत असताना कोरोनाबधित होऊन कोरोनामुक्तही झाले आहेत. महाराष्ट्र राज्य गृह विभागाचे होमगार्ड विभाग जिल्ह्यात कार्यरत आहे. जिल्ह्यात १०० महिला व ७२० पुरुष जवान हे होमगार्ड म्हणून कार्यरत आहेत. पोलीस दलाला मदत व्हावी यासाठी होमगार्ड जवान हे नेहमी त्यांच्या खांद्याला खांदा लावून सक्रियपणे आपले कर्तव्य बजावत असतात. जिल्ह्यात मोर्चे, आंदोलन, नाकाबंदी, निवडणुका असल्या की होमगार्ड जवान हे पोलिसांच्या मदतीला असतात. त्यामुळे, पोलिसांचा भारही काही प्रमाणात कमी होत होतो.
कोरोना महामारी सुरू झाल्यापासून जिल्ह्यात होमगार्ड जवान हे पोलिसांच्या मदतीला धावून आले आहेत. ३०० होमगार्ड पोलिसांसोबत जिल्ह्यात काम करीत आहेत. सहा होमगार्ड हे कोरोना काळात आपले कर्तव्य बजावताना कोरोनाबाधित झाले होते. सहाही जण कोरोनामुक्त होऊन पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. ते कोरोना काळात नाकाबंदी, कंटेन्मेंट झोन परिसरात पोलिसांच्या सोबतीने अहोरात्र काम करीत आहेत. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून ते सुद्धा कोरोना महामारी काळात कोरोनयोद्धा म्हणून उल्लेखनीय काम करीत आहेत.
हेही वाचा- पनवेल : शेकापच्या बालेकिल्ल्यात मनसेची जोरदार मुसंडी!