रायगड- जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाछापूर विभागाला काल दुपारी मुसळधार पाऊस आणि वादळीवाऱ्याने चांगलेच झोडपले. यामध्ये अनेक घरांचे पत्रे व कौले फुटून मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून कोसळली आहेत. नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले.
हवामान विभागाने २७ ते ३० एप्रिल दरम्यान रायगडात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार काल सुधागड तालुक्यातील काही भागात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली होती. सुदैवाने मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पावसामुळे सुधागडातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.