रायगड - गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.
महाड येथील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तर अंबा नदीचे पाणी नागोठणे शहरात घुसले असून पाली आणि जांभुळपाडा पुलांवरून पाणी जात आहे. त्यामुळे वाकण मार्गे पाली, खोपोली जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.
कर्जतमधील उल्हास नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. पेण तालुक्यातील जोहे-तांबडशेत रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे ७0 गावांचा संपर्क तुटला आहे. कळंब राज्य मार्गावरील दहिवली पूल आणि वांगणी पाषाने पूल पाण्याखाली गेले आहेत. तर, पोलादपूर तालुक्यातील सवाद, धारवली, कालवली, वावे, हावरे आदी गावांशी संपर्क तुटला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना तसेच शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.